<cesDoc id="mar-w-translat-literature-ss00b001.mal" lang="mar">
<cesHeader type="text">
<fileDesc>
<titleStmt>
<h.title>mar-w-translat-literature-ss00b001.mal.txt</h.title>
<respStmt>
<respType>Electronic file created by</respType>
<respName>Central Institute for Indian Languages, Mysore</respName>
<respType>transferred into Unicode and CES format by</respType>
<respName>"Unicodify" software by Andrew Hardie</respName>
</respStmt></titleStmt>
<publicationStmt>
<distributor>UCREL (on behalf of CIIL)</distributor>
<pubAddress>Department of Linguistics, Lancaster University, Lancaster, LA1 4YT, UK</pubAddress>
<availability region="WORLD"></availability>
<pubDate>03-07-25</pubDate>
</publicationStmt>
<sourceDesc>
<biblStruct>
<monogr>
<h.title>मेख मोगरी</h.title>
<h.author>रणजित देसाई</h.author>
<imprint>
<pubPlace>India</pubPlace>
<publisher>Unknown - अनिल मेहता ,मेहता पब्लिशि剗䍌</publisher>
<pubDate>1990</pubDate>
</imprint>
<idno type="CIIL code">ss00b001.mal</idno>
</monogr></biblStruct></sourceDesc></fileDesc>
<encodingDesc>
<projectDesc>Text collected for the CIIL Corpus, subsequently integrated into the EMILLE/CIIL Monolingual Written Corpora.</projectDesc>
<samplingDesc>Simple written text only has been transcribed. Diagrams, pictures and tables have been omitted. Sampling begins at page WRLC.</samplingDesc>
<editorialDecl><conformance level="1"></conformance></editorialDecl>
</encodingDesc>
<profileDesc>
<creation><date>03-07-25</date></creation>
<langUsage>Marathi</langUsage>
<wsdUsage>
<writingSystem id="ISO/IEC 10646">Universal Multiple-Octet Coded Character Set (UCS).</writingSystem>
</wsdUsage>
<textClass>
<channel mode="w">print</channel>
<constitution type="composite"></constitution>
<domain type="public"></domain>
<factuality type="fiction"></factuality>
</textClass>
<translations></translations>
</profileDesc>
<revisionDesc></revisionDesc>
</cesHeader>

<text><body>
 
एकूण पाने : -14
from 15 to  28</p>

<p>+
पान नं. - 15</p>

<p>अहिरावांच्या नजरेकडे बघत तुकोजीराव माणिकरावांच्या जवळ गेले. तुकोजीराव
म्हणाले,
        ""अहिराव, ती मेख मोगरी आहे ना, ती निंबाळकरांची मिजास आहे.""
        ""मतलब ?""
माणिकराव सांगते झाले, ""साफ आहे. अहिराव , आमच्या घराण्याचा असा
पण आहे. कुणीही यावं आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वाडे लुटून दाखवा ~
वेत. जो त्यात यशस्वी होईल त्याला ती मोगरी मिळेल.""
        ""आणि तसं झालं नाही तर -""
        ""तसं झालं नाही तर !"" माणिकरावांची छाती रुंदावली. ""तसं झालं
नाही तर ती मेख आहे ना तिनं आव्हान स्वीकारणाऱ्याचं मस्तक मारलं जाईल.
समोरचा कट्टा त्याचसाठी आहे.""
        ""मग ते आव्हान कुणी स्वीकारलं नाही ?""
        ""आमच्या पिढीत तर नाही. पण मागच्या पिढयांत एक-दोघांनी ते धाडस
केलं आणि मस्तकात मेख मारून त्यांचा अंत झाला असं सांगतात.""
        ""या पिढीत कोणीच का धजलं नाही ?""
        ""हं कोण धजणार ? आता नवीन पिढीत तो दम राहिला नाही. दम राहिला
तो डोईच्या मंदिलात आणि कमरेच्या शोभेच्या तरवारीत.""
        ""आणि आम्ही हे आव्हान स्वीकारलं तर ?"" अहिरावांनी शांतपणे विचारलं.
माणिकराव घाबरे झाले. गडबडीनं ते म्हणाले,
        ""तुम्ही आमच्या मित्राचे चिरंजीव आहात. एकुलते एक ; हे विसरू नका.""
        ""आम्ही जरूर विचार करू. पण आम्हाला वाटतं तुमच्या घराण्याचं हे
आव्हान आम्ही जरूर स्वीकारू.""
        ""काय बोलता अहिराव ?"" तुकोजीराव म्हणाले.
        ""आबासाहेब, खरं तेच सांगतो. डोईचा मंदील, ओठावरच्या मिश्या आणि
कमरेची तरवार एवढीच आमची मिजास आहे असं साऱ्यांना वाटतं. हा आमचा
अपमान नव्हे तर साऱ्या तरुण पिढीचा अपमान आहे. तो आम्ही कदापिही
सहन करणार नाही. आम्ही जिंकू किंवा मरू. पण आम्ही हे आव्हान स्वीकारलं
एवढं तरी मागे राहिल. बस्स ! ठरलं !"" निश्चयाने अहिराव म्हणाले, ""जोवर
आम्ही हे वाडे लुटणार नाही तोवर आम्ही मंदील बांधणार नाही."" असं म्हणून</p>

<p>पान नं. - 16</p>

<p>अहिरावांनी डोईचा मंदील काढला आणि तो काखेत मारला.
        साध्या बोलण्यातून हे विपरीत वळण लागलेलं पाहून तुकोजीराव , माणिकराव
पुरे अस्वस्थ झाले होते. त्या दोघांच्याकडे न बघता अहिराव वाडयाकडे चालू
लागले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात माणिकराव म्हणाले,
        ""तुकोजीराव, तुम्ही तरी सांगा.""
        निराशेने मान हलवत तुकोजीराव म्हणाले,""बाण सुटला माणिकराव. ते
आता आमच्या हाती नाही. त्यांचा आम्हाला माहीत आहे. ते भारी हट्टी
आहेत. सांगून चे ऐकायचे नाहीत. सांगायला गेलं तर फक्त आमचा शब्द खाली
पडेल. ""
        ती वार्ता साऱ्या वाडयाभर पसरायला वेळ लागला नाही. सर्वत्र कुजबूज चालू
होती. त्या रात्रीच्या मेजवानीला नेहमीचा रंग भरला नाही. रात्री निजानिज
झाली आणि अहिरावांच्या महालात गौरी आली. अहिरावांनी विचारलं,
        ""काय आहे ?""
        ""ताईसाहेबांनी आपल्याला बोलावलंय.""
        ""आम्हाला ?""
        ""जी.""
        अहिराव उठले आणि गौरी पाठोपाठ चालू लागले.
        सखूबाईच्या महालात दारी चिकाचा पडदा सोडला होता. आतून
बांगडयांचा आवाज आला, आणि त्यापाठोपाठ शब्द आले,
        ""आपण वाडे लुटायला येणार असं ऐकलं. खरं ?""
        ""हो.""
        ""असलं धाडस करू नये. ऐकावं.""
        ""धाडसाशिवाय पुरुष जगत नाही.""
        ""पण असलं वेडं धाडस...""
        ""धाडस नेहमी वेडंच असतं .""
        ""आजवर कुणाला ते जमलं नाही. ते तुम्हालाही जमणार नाही. आम्हाला
त्या मेख मोगरीची नेहमीच किळस येते. आपल्या ऐश्वर्याची मिजास सांगायला
ती मेख मोगरी लावायचं काहीच कारण नव्हतं.""
        ""पण लावलेय ना ! निंबाळकरांची मिजास ते अजूनही बाळगतात ना ?</p>

<p>पान नं. - 17</p>

<p>ती केव्हा ना केव्हा उतरलीच पाहिजे.""
सखूबाईंचा अभिमान दुखावला.
""ठीक आहे. मला ते पाहायचं आहे. निंबाळकर एवढे सोपे नाहीत.""
"" ते आम्ही पाहू. येतो आम्ही.""
आणि अहिराव आपल्या शयनगृहाकडे चालू लागले. पडद्यामागे उभ्या
असलेल्या सखूबाईंचे डोळे भरून आले. आपल्या डोळ्यातून अश्रू का ओघळतात
हे त्यांना कळत नव्हतं.</p>

<p>        दुसऱ्या दिवशी मानपान घेऊन निंबाळकरांचा निरोप घेऊन जाधवरावांची
मंडळी गढी सोडती झाली. निरोप घेत असता दोघांनाही काही बोलवत नव्हतं.</p>

<p>        जाधवांची रवानगी झाली पण त्याचबरोबर निंबाळकरांच्या वाडयाचं स्वास्थ्यही
नाहीसं झालं. सारं वातावरण कसं तंग होतं. एके दिवशी सखूबाई आपल्या
महालात असताना गौरी आत आली आणि म्हणाली,
        ""विठोजी आला आहे.""
        ""आत पाठव.""
        विठोजी आत आला. त्यानं मुजरा केला. एक दीर्घ नि:श्वास सोडून सखू ~
बाईंनी विचारलं,
        ""का आलास बाबा ? आबासाहेबांनी बोलवलंय ?""
        ""न्हाई जी."" विठोजी म्हणाला, ""आपलं पाय दिसलं न्हाईत म्हणून
आलो. ""
        ""बरं केलंस.""
        ""ताईसाहेब, लई आवई उठलीया.""
        ""कसली ?""
        ""ते अहिराव वाडं लुटायला येणार म्हनं.""
        ""हां. मीही ऐकलंय. ""
        ""येऊ द्यात. आपल्या मरनानं मरतात तर मरूद्यात.""
        ""विठोजी !"" सखूबाई उठत म्हणाल्या तिचा आवाज करडा बनला होता.
स्वत:ला सावरत विठोजी म्हणाला, ""ताईसाहेब, खरं सांगू ? तसा दिलदार</p>

<p>पान नं. - 18</p>

<p>मानूस बगायला मिळायचा न्हाई. जाताना वाडयातल्या सगळ्या बायांना, कामकरी
मानसांना मूठमूठभर खुशाली दिली. आनी -""
        ""आणि काय ?""
        विठोजी क्षणभर घुटमळला. धीर करून म्हणाला,
        ""जाताना आपला पटका माझ्या हाती दिला. म्हणालं -""
        ""काय ?""
        ""ते म्हणालं, विठू हा पटका जतन कर. आम्ही मानानं परत आलो तर हा
आम्हाला परत दे. तसं झालं न्हाई तर आमच्या माघारी आमचा हा पटका
तुमच्या ताईसाहेबांना दे.""
        ""असं म्हणाले ?"" सखूबाईचे डोळे विस्फारले होते.
        ""जी !""
        ""आबासाहेब कुठं आहेत ?""
        ""आपल्या महालात जी.""
        ""ठीक आहे. तू जा.""
        विठू जाताना मनातून उद्विग्न झालेल्या सखूबाई माणिकरावांच्या महालाकडे
चालू लागल्या. महालात माणिकराव एकटेच होते. गेले चार दिवस तेही बेचैन
होते. सखूबाईंना पाहताच ते म्हणाले,
        ""ये सखू. बरं झालं तू आलीस ते. दिवाळी आता जवळ आली. नोकर ~
चाकर, शिबंदीचे पोषाख अजून व्हायचे आहेत. त्यासाठी फलटणहून वाण
मागवली आहेत. तू त्याची  निवड कर. तसंच तुम्हाला लागणाऱ्या सामानाची
यादी तू कारभाऱ्याकडे दे.""
        ""जी.""
        ""सखू ,उभी का ? बस ना !""
        पण सखूबाई बसल्या नाहीत. त्या तशाच उभ्या होत्या. माणिकरावांच्याकडे
पाहात विचारलं,
        ""आबा, तुम्हांला वाटतं की, ते जाधव वाडे लुटायला येतील ?""
आपल्या मांडीवर थाप मारीत माणिकराव म्हणाले, ""असं वाटतं खरं.</p>

<p>पान नं. - 19</p>

<p>त्याचमुळे आम्ही बेचैन आहोत.!""
        ""मग कशाला ती मेख मोगरी टांगलीत ? काढून फेकून द्यायची होतीत.""
        एक उसासा सोडून माणिकराव म्हणाले, ""कैक वेळेला तो विचार आमच्या
मनात आला. पण ती पिढयान् पिढया चालत आलेली. तिला धक्का लावण्याचं
बळ आमचं नाही.""</p>

<p>        ""बळ ! कसलं बळ आबा ? तुमचं घराण्याचं ऐश्वर्य सांगण्यासाठी ती मेख
मोगरी ! थुंकते मी त्यावर. तुमच्या ऐश्वर्याचा  दिमाख दाखविण्यासाठी वीरांचा
बळी. आबासाहेब, पूर्वपुण्याईनं तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरते. ते सांगण्या ~
साठीच ना ही मेख मोगरी ? घराण्याची प्रतिष्ठा म्हणे ! कसली प्रतिष्ठा ? कुणासाठी
हे ? नशिबानं ऐश्वर्य मिळालं ते लोकाचं भलं व्हावं म्हणून. त्यासाठी वीरांचा
बळी घेतला जाऊ नये. त्यात ना स्वाभिमान ना कीर्ती. आबासाहेब, तुमच्या
पिढीत हा कलंक ह्या घराण्याला लावू नका.""</p>

<p>        ""कळतं पोरी, सारं कळतं."" हताश होऊन माणिकराव म्हणाले, ""कळतं
पण वळत नाही त्याला मी काय करू ? मी परोपरीनं अहिरावांना वळविण्याचा
प्रयत्न केला. पण त्यांनी मानलं नाही. आता ते अहिराव नाहीत. ती घराण्याची
प्रतिष्ठा आहे. त्याला मी बद्ध आहे. त्यात मला आनंद नाही हे लक्षात ठेव.""</p>

<p>        ""राहिलं ! जाते मी. तुमच्या घराण्याची प्रतिष्ठा तुम्ही सांभाळा."" माणिकराव
बैठकीवरून उठून सामोरे आले. त्यांनी सखूला मिठीत घेतलं.</p>

<p>        ""पोरी, निदान तू तरी माझ्यावर रागवू नको. सुदैवानं अहिरावांनी पण
जिंकला तर त्यात मला आनंदच आहे. पण तसं घडेल असं वाटत नाही. जे
होईल ते खरं ! ते सोसायचं बळ आम्हाला मिळावं यासाठी देवाची प्रार्थना करतो.""</p>

<p>        आपले अश्रू टिपत सखूबाई त्या मिठीतून दूर झाल्या. विमनस्कपणे आपले
अश्रू पुसत त्या महालाबाहेर निघून गेल्या.</p>

<p>
        दिवस उलटत होते. पण काही घडत नव्हतं. उलटणाऱ्या दिवसाबरोबर
सुटकेचा एक नि:श्वास बाहेर पडत होता. पण हे समाधान फार काळ टिकलं
नाही. एके दिवशी जाधवांचा एक स्वार खलिता घेऊन आला. थरथरत्या हातांनी
तो खलिता माणिकरावांनी उघडला. त्यांची नजर खलित्यावरून फिरत होती.</p>

<p>पान नं. - 20</p>

<p>खलिता वाचून होताच थरथरत्या हातातून गळून पडला.
        अहिरावांनी आव्हान स्वीकारलं होतं.</p>

<p>        माणिकराव सुन्न होऊन पलंगावर बसले. किती वेळ गेला हेही त्यांना कळलं
नाही. पावलांच्या आवाजानं ते भानावर आले. सखूबाई आत येत होत्या. त्यांचा
चेहरा कोमेजलेला, चिंताक्रांत होता. माणिकरावांनी एकदम सखूबाईंच्याकडे
पाहिलं. आणि परत मान खाली घातली.
        ""आबा, जाधवांचा खलिता आला आहे म्हणे !""
        माणिकरावांचा संताप उसळला. उठत ते म्हणाले,
        ""कोणी सांगितलं हे ? ह्या वाडयात कुठलीही गोष्ट खाजगी राहात नाही.""
        माणिकरावांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सखूबाईंनी परत विचारलं,
        ""खलिता आला आहे हे खरं ना ?""
        ""हो !"" घोगऱ्या आवाजात माणिकराव म्हणाले.
        ""काय म्हणतात जाधव ?""
        ""त्यांनी आव्हान स्वीकारलं आहे. पुढच्या पंधरवडयात ते वाडे लुटायला
येणार आहेत.""
        ""ही हिम्मत ! खुशाल या म्हणावं. ""
        ""पोरी, एवढं सोपं नाही ते. याचा परिणाम काय होईल हे तुला माहित
नाही. यातून फक्त वैर निर्माण होईल. पिढया-पिढयांची मैत्री तुटून जाईल. एक
उतरतीकडे सरकल्या जीवाचा निर्वंश होईल. आणि...""
        ""त्याला आम्ही जबाबदार नाही. हा वेडा हट्ट त्यांनीच स्वीकारला. म्हणे
धाडस नेहमीच वेडं असतं. त्याची फळं ते भोगतील....""
        ""कुणाबद्दल बोलतेस हे ?""
सखूबाई एकदम भानावर आल्या. आपण काय बोलून गेलो हे त्यांच्या
ध्यानी आलं. स्वत:ला सावरत त्या म्हणाल्या,
        ""काही नाही. आबा. त्यांना कळवा. पंधरा दिवसांनी कशाला ? येणार
असाल तर उद्या या म्हणावं..."" आणि सखूबाई उत्तराची वाट न पाहता
महालाबाहेर निघून गेल्या.</p>

<p>पान नं. - 21</p>

<p>        दिवस सरत होते. आणि एके दिवशी गढीबाहेरच्या माळावर जाधवांच्या
बैलगाडया, सांडणीस्वार दाखल झाले. त्या माळावर दोन प्रशस्त डेरे उभारले
गेले. त्या समोर एक शानदार शामियाना उभारला गेला. शिबंदीच्या राहुटया
सजल्या. शिबंदीचे जेवणखाणे तेच करीत होते. त्यानंतर दोन सुरेख बैलगाडया
त्या तळावर आल्या. बैलांच्या शिंगांना सुवर्णाच्या शेंब्या होत्या. बैलांच्या पाठीवर
जरी झुली होत्या. देखण्या बैलगाडयांच्या चाकावर चांदीच्या फुल्या मारल्या होत्या.
त्या दोन बैलगाडयांच्याकडे माणिकरावांची शिबंदी कौतुकानं पाहात होती -</p>

<p>        आणि एके दिवशी टापांचा धुरळा उधळला. तुकोजीराव आणि अहिराव
डेरेदाखल झाले. ती बातमी माणिकरावांच्या कानावर आली. आतापर्यंत ऐकत
बसलेल्या माणिकरावांना राहावलं नाही.</p>

<p>        दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या खास सेवकासह ते गढीबाहेर पडले.
जाधवांच्या शामियान्यासमोर ते आले आणि शामियान्यातून तुकोजीराव, अहिराव
सामोरे आले. मुजरे झडले. पण उराउरी झाली नाही. तुकोजीराव म्हणाले,
        ""आत चलावं.""
        ""आत ?"" माणिकरावांचा संयम सुटला,""काय थट्टा चालवलेय तुम्ही ?
पोराच्या संगतीला लागून तुम्हीही नादान बनलात ? निंबाळकरांचे वाडे केव्हा
ओस पडले की, त्यामुळे माळावर आपल्या छावण्या टाकाव्यात ! हा तमाशा
का मांडलात ? जबाब द्या -""
        अहिराव पुढे आले. अदबीनं ते म्हणाले,
        ""सरकार, बेअदबीची कसूर माफ व्हावी. आम्ही आपला पाहुणचार एकदा
मनसोक्त उपभोगला आहे. कुबेरालाही लाजवील असं निंबाळकरांचं ऐश्वर्य आम्ही
पाहिलं आहे. पण या खेपेला आम्ही आपले पाहुणे नाही. आम्ही वाडे लुटायला
आलो असता आपल्या घरी राहणं योग्य नाही. गैरसमज न व्हावा ही विनंती. ""</p>

<p>        काय बोलावं हे माणिकरावांना कळत नव्हतं. ते अहिरावांच्याकडे पाहात होते.
मस्तकी फेटा नव्हता. काळेभोर केस मानेवर रुळत होते, अंगात मलमली कुडता,
पायात चुस्त विजार आणि मोजडी होती. अंगरख्यावर दुशेला नव्हता...""
        ""केव्हा येणार वाडे लुटायला ?"" स्वत:ला सावरत माणिकरावांनी विचारलं.
        ""अष्टमीचा मुहूर्त धरला आहे."" अहिरावांनी सांगितलं.
        ""ते बरं ?"" माणिकरावांनी उपरोधानं विचारलं.</p>

<p>पान नं. - 22</p>

<p>""अष्टमी हा लक्ष्मीचा दिवस. लक्ष्मी लुटायची झाली तर...""
""ठीक, ठीक !"" माणिकराव उद््गारले. ""पण लक्षात ठेवा अहिराव, लक्ष्मी
चंचल असते. सहसा सहजपणे ती कुणाला गवसत नाही.""
""ते आम्ही पाहू."" अहिराव म्हणाले.
""जरुर पाहा. पण अहिराव, अजून सांगतो तुमचं आमचं वैर नाही.
हा पण विसरून जा. आमच्या मैत्रीत हा मिठाचा खडा टाकू नका तुकोजीराव.""
        तुकोजीरावांनी खाली मान घातली होती. माणिकराव नि:श्वास सोडून म्हणाले,
         ""ठीक आहे. येतो आम्ही.""
        ""आत चलावं -""
        ""नाही !"" ताड्कन माणिकराव म्हणाले, ""जे दरोडेखोर आहेत. त्यांच्या
निवासात आम्ही कसे येणार ? आम्ही येतो-"" म्हणत माणिकरावांनी पाठ
फिरवली.
        ""सरकार-"" अहिरावांनी हाक मारली. माणिकराव वळले. अहिराव पुढे
धावले आणि त्यांनी माणिकरावांच्या पायांवर हात ठेवले.
        मागे सरत माणिकराव म्हणाले,""हे काय करता ?""
        ""आशीर्वाद द्यावा -""
माणिकराव गहिवरले. ते म्हणाले ,"" उठा ! अहिराव, आम्ही हरलो तर त्या
इतका आनंद आम्हाला दुसरा नाही. पण तुम्ही हरलात तर त्यापरते दु:ख नाही
हे लक्षात ठेवा. आम्ही येऊ ?""
        ""जरा थांबावं."" अहिराव म्हणाले, ""आम्ही वाडे लुटायला जरूर येऊ.
पण त्यासाठी दोन अटी आहेत.""
        ""अटी ! कसल्या अटी ?""
        ""जेव्हा आम्ही येऊ तेव्हा शिबंदीचे रक्षक , दासदासी असून चालणार
नाही. सारे वाडे मोकळे असायला हवेत.""
        ""कारण ?""
        ""सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आम्ही वाडे लुटणार, हे खरं ?""
        ""अलबत.""
        ""मग येवढया थोडया वेळात आम्ही वाडे लुटणार. तुमची माणसं असली
तर गोंधळ उडेल.""</p>

<p>पान नं. - 23</p>

<p>        ""ठीक आहे. आमची माणसं असणार नाहीत. मग तर झालं ? फक्त
आमच्या देवपूजेला ब्राम्हण येईल.""
        ""चालणार नाही."" अहिराव कठोरपणे म्हणाले.
        ""का ?""
        ""का ! साफ आहे वाडे आम्हाला मोकळे हवेत. तेथे क्षणालाही महत्व
आहे. त्यामध्ये पूजा-अर्चा, नैवेद्य आणि घंटानाद याचा उपद्रव नको. ""
        ""अहिर S"" माणिकराव उद््गारले. पण तिकडे लक्ष न देता अहिराव
बेडरपणे उभे होते.
        ""हे जन्म मरणाला आव्हान आहे. सरकार. त्यात कुठलीही कुचराई आम्ही
स्वीकारणार नाही.</p>

<p>        माणिकराव आपला संताप आवरत म्हणाले,""ठीक आहे. मित्रप्रेमापोटी
आम्ही तुमची अट स्वीकारतो. आमचे वाडे तुमच्यासाठी मोकळे राहतील.
आमचा निवास आणि राणीवशाचा महाल तेवढी जागा सर्व वाडयातून वगळा.
तुम्ही वाडे लुटलेत की, आम्हाला खबर द्या. आम्ही अन्य ठिकाणी जाऊ. मग
उरलेले आमचे महाल लुटा. मान्य ?""
        ""जी !""</p>

<p>        माणिकराव म्हणाले, ""एक दिवस पूजा झाली नाही तर नाही झाली. दुसरे
दिवशी तुम्ही हरल्यावर आम्ही अभिषेक करू.""</p>

<p>        बोलता बोलता माणिकरावांचा कंठ दाटला. ""आम्ही जरूर येऊ अभिषेक करू
एक फुलांचा आणि दुसरा अश्रुंचा. येतो आम्ही.""
        माणिकराव निघून गेले. त्यांना अडवायचं बळ दोघांचंही नव्हतं.</p>

<p>
दिवस उलटत होते. सप्तमी झाली. सखूबाई सज्जात उभ्या राहून ती धीट
चंद्रकोर पाहात होत्या.</p>

<p>        द्वितीयेपासून कलेकलेने वाढत जाणारी चंद्रकोर पाहण्यात सखूबाई केवढया
रममाण होत असत. पण आता त्या चंद्रकोरीकडे बघण्यात त्यांना आनंद वाटत
नव्हता.
        खरंच ! ही चंद्रकोर पौर्णिमेचं रूप घेईल का ?</p>

<p>पान नं. - 24</p>

<p>ते तिला साधेल का ?
वेडे ! सप्तमीचा चंद्र उभा आहे.
तो पौर्णिमा गाठल्याखेरीज थोडाच थांबणार ?
वेडी आशा !
मध्येच ग्रहण लागलं तर ?
ती कल्पनाही सखूबाईंना असह्य झाली. त्या अशाच माघारी वळल्या. आत
जाऊन त्यांनी आपल्या पलंगावर अंग झोकून दिलं.
        दबक्या पावलांनी गौरी आत आली. तिनं धीर करुन विचारलं,
""ताईसाब -""
""काय ग ?"" त्रासिकपणे सखूबाई म्हणाल्या.
""आजच्या जेवणाचा बेत -""
""मसणात गेला !"" सखूबाई उफाळल्या. ""हवं ते करा. मला काय सांगू
नका. मी खाली येणार नाही. कळलं ?""
        ""जी"" म्हणत गौरी त्वरेनं खाली गेली.</p>

<p>पहाट झाली. अहिराव स्नान करून बाहेर आले. ते वाडयाच्या दरवाजाकडे
पाहात होते. सारी शिबंदी आज्ञेप्रमाणे सज्ज झाली होती. अहिराव तुकोजीरावांच्या
डेऱ्यात गेले. त्यांनी त्यांना वंदन केले. सुन्न झालेले तुकोजीराव गुडघ्याच मान
घालून बसले होते. त्यांनी वर पाहिलं. काय बोलावं ते त्यांना काही सुचत नव्हतं
शेवटचा प्रयत्न म्हणून ते म्हणाले,
        ""अहिराव, हा हट्ट अजूनही सोडा. मी माणिकरावांना समजावीन.""
        ""नाही आबासाहेब. ते आता होणे नाही.""
        अहिरावांच्या करारी मुद्रेकडे पाहात तुकोजीराव म्हणाले, ""ठीक आहे.
औक्षवंत व्हा. ""</p>

<p>        वडिलांचा निरोप घेऊन अहिराव डेऱ्याबाहेर आले. पूर्व क्षितिजावर भगाटलं
होते. अहिरावांची सारी शिबंदी सज्ज होती. सूर्योदय व्हायची वेळ नजीक आली
होती. अहिराव आपल्या घोडयालर स्वार झाले.</p>

<p>        सूर्यबिंब उमटू लागले. आणि हरहर महादेव घोष साऱ्या परिसरात घुमला.</p>

<p>पान नं. - 25</p>

<p>        अहिराव आपल्या शिबंदीसह वाडयात घुसले होते. त्यांच्या पाठोपाठ त्या
देखण्या बौलगाडया आणि पाठोपाठ येणारा मेणा त्या वाडयात प्रवेश करता झाला.</p>

<p>        माणिकरावांच्या पहिल्या वाडयाची लुटालूट सुरू झाली. जामदारखान्यातली
एखादी संदूक बैलगाडीत ठेवली जात होती. आणि पाठोपाठ साऱ्या महालातल्या
गाद्यागिर्द्या बैलगाडीत भरल्या जात होत्या. माणिकराव आश्चर्याने ती लूट
पाहात होते. चांदीच्या समया, भांडारखान्यातील द्रव्य याला कोणीच हात लावत
नव्हतं. लूट चालली होती ती वरपांगी कपडयालत्त्यांची. गाद्या-गिर्द्याची. साऱ्या
महालात अहिरावांच्या माणसांची वर्दळ जत्रेसारखी होत होती. त्याचा अर्थ
माणिकरावांना कळत नव्हता.</p>

<p>        दोन प्रहर टळत आली तरी वाडयाचा चार आणे भाग उचलला गेला
नव्हता. पाहता पाहता सायंकाळ झाली. बघता बघता सूर्य अस्ताला गेला आणि
वेशीतनं निंबाळकरांचं विजयाचं शिंग फुंकण्यात आलं.
        माणिकराव धावत खाली आले. ते गहिवरून अहिरावांना म्हणाले,
        ""अहिराव हरलात ना ?""
        ""या क्षणी ते म्हणायला हरकत नाही. आम्ही येतो.""
        ""अहिराव, आम्ही सांगितलं होतं. पण तुम्ही ऐकलं नाही. हा दुर्दैवी प्रसंग
तुम्ही आमच्यावर ओढवलात. याता नतीजा माहित आहे ?""
        ""जी.""
        ""उद्या सकाळी तुम्हाला याच वेशीमध्ये यावं लागेल. मेखसून तुमचं मस्तक
मारलं जाईल. जा तुम्ही.""
        अहिराव हसले. ते म्हणाले,
        ""आणि आम्ही पळून गेलो तर ?""
        ""अहिराव, आम्ही तुमच्यापेक्षा तुमच्या वडिलांना ओळखतो. जाधवांच्या
घराण्यात पळून जायची सवय नाही. तसं घडलं तर जाधवांच्या घराण्याला त्या ~
पेक्षा मोठा कलंक लागणार नाही.""
        आणि एवढं बोलून माणिकराव जड पावलांनी माघारी वळले.
        वाडयात येताच सखूबाई माणिकरावांच्या सामोरी आल्या. भयभीत नजरेनं
त्यांनी विचारलं,</p>

<p>पान नं. - 26</p>

<p>        ""जाधव हरले हे खरं ?""
        ""हा ! हरलं ! त्याचं प्रायश्चित त्यांना भोगावं लागेल.""
        ""आबा SS""
        ""पोरी, माझे हातपाय घराण्याशी जखडले गेले आहेत. हा दिवस आला
नसता तर फार बरं झालं असतं. आता त्याला इलाज नाही. जे घडणार आहे ते
टळणार नाही. जा सखू...झोप जा... उद्याची सकाळ बघायला जागी होऊ
नको...""</p>

<p>        अश्रुपूर्ण नजरेनं सखूबाई वळल्या. पाठमोऱ्या झालेल्या बापाकडे पाहायचा
धीर त्यांना राहिला नव्हता.</p>

<p>        भल्या पहाटे अहिराव स्नान व पूजा आटोपून गढीच्या प्रवेशद्वाराशी जाण्या ~
साठी सज्ज झाले होते. तुकोजीरावांच्या मंडळींत उदासीनतेची छाया पसरली
होती. अहिराव तुकोजीरावांच्या डेऱ्याकडे गेले आणि म्हणाले,
        ""आबासाहेब , जाण्याची तयारी झाली आहे. आपण चलावं.""
        तुकोजीरावांचा उरलेला संयम ढळला होता. ते गरजले,
        ""कशाला आम्हाला बोलवता ? तमाशा पाहायला ?""
        ""आबासाहेब, आपण वीर आहात. जे होईल ते पाहणं तुमचं कर्तव्य आहे.
उठा आबासाहेब. या वेळी तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहायला हवं.""
        पाठीशी !
        अरे, तुमचं रूप पाहण्यात आयुष्याचं देहभान हरपलं.
        ते रूप कोमेजलेलं पाहायला बोलावतोस ?
    प्रतिष्ठा !
        घराण्याची प्रतिष्ठा !
        अशा अग्निदिव्यानीच का ती प्रतिष्ठा सांभाळावी लागते ?
        आपल्या विचारातून तुकोजीराव सावध झाले ते तितक्याच निष्ठुरपणे म्हणाले,
         ""आम्ही येतो.""</p>

<p>        सूर्य उगवला होता. गढीच्या प्रवेशद्वाराशी माणिकराव आणि त्यांचे सेवक
खाल मानेने उभे होते. घोडयांच्या टापांचा आवाज आला आणि साऱ्यांच्या
माना नकळत वर झाल्या. नामवंत पंचकल्याणी पांढऱ्याशुभ्र घोडयावरून येणारी
पिता-पुत्राची जोडी साऱ्यांच्या नजरेत आली. तुकोजीरावांच्या डोईला मंदील</p>

<p>पान नं. - 27</p>

<p>होता. पण अहिरावांच्या मस्तकी काही नव्हतं. हे देखणं रूप न्याहाळत असता
माणिकरावांच्या पायातलं बळ सरत होतं.</p>

<p>        गढीच्या प्रवेशद्वाराशी दोघंही पायउतार झाले. सारं बळ एकवटून माणिक ~
राव म्हणाले,
        ""तुकोजीराव, आम्ही आमच्या घराण्याच्या पणाला बद्ध आहोत."" आणि
आपल्या सेवकांकडे वळून ते म्हणाले, ""शिडी लावा आणि ती मेखसू उतरा.""
        अहिराव पुढे झाले, म्हणाले
        ""मेखसू कशाला उतरवता ? उतरायची झाली तर ती मोगरी उतरा.""
        ""मोगरी ?""
        ""हां मोगरी ! आज आम्ही तुमच्यासकट तुमचं ऐश्वर्य लुटलं आहे. तुम्हाला
ते मान्य करावं लागेल.""
        ""काय सांगता ?""
        ""खरं तेच सांगतो आहे.""</p>

<p>        - आणि अहिरावांनी टाळी वाजवली. त्या इशारतीबरोबर एक मेणा पुढे
आला. त्यातून एक धोप तरवार आणि ताम्रपट घेऊन अहिराव माणिकरावांच्य
पुढे नजर करीत म्हणाले,
        ""ही तुमची धोप-तरवार आणि ताम्रपट  या दोन्ही गोष्टी आम्ही लुटल्या
आहेत. आता तुमच्याजवळ राहिलयं काय ? तुमचं ऐश्वर्यच नव्हे पण तुमच्या ~
सकट सर्व काही आम्ही लुटलं आहे. अस्सल मराठे असाल तर हे मान्य करा.
नाहीतर आमचं मस्तक मारा...""</p>

<p>        विस्फारित नजरेनं माणिकराव त्या धोप तरवारीकडे आणि ताम्रपटाकडे पाहात
होते. ते उद्वेगानं म्हणाले,
        ""ठीक आहे. आम्ही मान्य करतो. त्यासाठीच ना त्या ब्राम्हणाला मज्जाव
केला होता ?""
        अहिराव हसले. ते म्हणाले,
        ""हो ! खरं आहे. सारेच डाव सरळपणानं जिंकता येत नाहीत. त्यासाठी
राजकारणाचे डावही खेळावे लागतात.""
        माणिकराव मनसोक्तपणे हसले. अहिरावांना मिठीत घेत म्हणाले,
        ""अहिराव, पराजयसुद्धा किती सुखकर असतो हे आज तुम्ही सांगितलंत.""</p>

<p>पान नं. - 28</p>

<p>आज आमच्यासकट सारे वाडे तुम्हाला मोकळे आहेत."" आणि सेवकांकडे
वळून त्यांनी सांगितलं,
        ""शिडया लावा आणि ती मोगरी खाली उतरा.""
        अहिराव म्हणाले,""आम्हाला ती मोगरी नको आहे... आम्हाला....""
अहिराव थबकले,
        माणिकरावांनी विचारलं. ""मग काय हवं ?""
        आणि तुकोजीराव पुढे येत म्हणाले, ""आम्ही जाणतो. त्यांना ती मोगरी
नको आहे. हवी आहे तुमच्या वाडयातली.""
        माणिकराव तुकोजीरावांच्या नजरेत बघत होते. बघता बघता त्यांच्या
ओठावर हसू उमटलं. मान हलवत ते मोकळेपणानं हसले.त्या हसण्यानं
त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. डोळ्यातलं पाणी न पुसता ते तुकोजीरावांना
म्हणाले,
        ""तुकोजीराव, आज आमच्या अहिरावांनी आम्हास साफ लुटलं....साफ
लुटलं....""
        आणि माणिकराव पुढे झेपावले. त्यांनी तुकोजीरावांना कडकडून मिठी मारली.
        उंच कमानीवर दिमाखात लटकत असलेल्या मोगरीकडे कुणाचंच लक्ष
नव्हतं. त्यांची ती उराउरी भेट सारे भान हरपून बघत होते.</p>

<p></p>

<p>*                                                                                 शब्द :-&gt; 2550
----------------------------------------------------------------
 Cont'd
",0
</p></body></text></cesDoc>